हर्षाली करणार किलिमांजारोवर स्वारी

१८ जानेवारीला प्रस्थान : गतवर्षी जपानच्या फुजी शिखरावर फडकवला होता तिरंगा

वसई (प्रतिनिधी) : आपल्या खडतर व साहसी गिर्यारोहण मोहिमांमुळे गाजत असलेल्या हर्षाली वर्तक (३२) हिने आफ्रिका खंडातील सर्वात उंच अशा ‘माउंट किलिमांजारो’ (५८९५ मीटर) हे शिखर सर करण्याची मोहिम हाती घेतली आहे. तिने जपान मधील माउंट फुजी (३७७६ मीटर ) वर भारताचा तिरंगा फडकवला होता.

देशात व आंतरराष्ट्रीयस्तरावर आपल्या अनेक खडतर व साहसी मोहिमा यशस्वी करून सर्वत्र नावारूपाला आलेली तसेच, वसईकरांचा अभिमान असणारी हर्षाली आपल्या देश-विदेशातील १२ गिर्यारोहकांच्या चमू सोबत १८ जानेवारी रोजी वसईतून थेट टांझानिया-केनियाला रवाना होत आहे. ती २४ जानेवारीला मोहिम फत्ते करून २८ जानेवारीला परत येणार असल्याची माहिती तिने लोकमतला दिली.

‘माउंट किलिमांजारा’ टांझानिया देशाच्या ईशान्य भागात व केनियाच्या सीमेजवळ असून त्याची उंची (५८९५ मीटर) म्हणजेच १९,३४१ फूट इतकी आहे. यावेळी ती स्वत: या मोहिमेचे नेतृत्व करणार असून कॅप्टन बिजॉय हे तिला सहकार्य करणार आहेत. या मोहिमेमध्ये देशातील हैद्राबाद, बंगळुरू,दिल्ली आणि रशिया, ऑस्ट्रेलिया येथील १२ गिर्यारोहकांचा सहभाग असणार आहे.

माउंट किलीमांजारो या शिखराविषयी

माउंट किलीमांजारो हा आफ्रिका खंडामधील सर्वात उंच पर्वत आहे. तो ज्वालामुखीच्या उद्रेकाने तयार झाला असून कोणत्याही पर्वतरांगेचा भाग नसलेला हा जगातील सर्वात उंच पर्वत आहे.

हिमालयात केले अनेक ट्रेक

तिने प्रथम हिमालयातील ट्रेकला सुरुवात केली. मात्र त्यांनतर तिने सहयाद्रीच्या पर्वत रांगामधील गड, किल्ले,लहान- मोठे पर्वत -शिखर आदी सर करण्यावर भर दिला होता.

हर्षालीचा प्रवास, पर्वत उंची :  माउंट फ्रें डशिप ५२८९, माउंट हनुमान तीब्बा ५९९०, माउंट युनाम ६११८, माउंट मेन्थोसा ६४४३, माउंट फुजी ३७७६ (उंची मीटरमध्ये).

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!