२१००० दिव्यांनी उजळणार वसई चा किल्ला !

वसई : रविवार दिनांक ४ नोव्हेंबर, २०१८ रोजी सायंकाळी ५ वाजता नरवीर चिमाजी आप्पा स्मारक, वसई किल्ला येथे “आमची वसई सामाजिक समुह” सालाबादाप्रमाणे वसई दुर्ग “दीपोत्सव” साजरी करण्यात येणार आहे.
धर्मांध पोर्तुगीजांच्या जाचातून वसईकरांना मुक्त करण्यासाठी २१००० मराठे हुतात्मा झाले अनेकांच्या अर्धांगिनी स्वेच्छेने सती गेल्या. आपल्या घरी दिवाळी- दसरा साजरी व्हावा म्हणून त्यांनी स्वतःच्या कुटुंबाचा व जीवाचा त्याग केला. दिवाळीत एकीकडे संपूर्ण वसई – विरार शहर, घरे, दुकाने, मंदिर, चर्च, मॉल्स, रस्ते प्रकाशमान होऊन जगमगत असतात तर दुसरीकडे पराक्रमी मराठा सैन्याच्या शौर्याचा व बलिदानाचा साक्षीदार असलेला बेलाग दुर्ग जंजीरा वसईचा किल्ला मात्र अंधारात असतो. पूर्वापार अनेक स्थानिक परिवार व धर्मसभा वसई किल्ल्यातील नागेश महातीर्थ व श्री नागेश्वर मंदिर परिसरात दीपावली साजरी करतात.
मराठा सैन्यामुळे व भारतीय जवानांमूळे आपण आज दिवाळी आनंदात साजरी करीत आहोत. त्या पराक्रमी सैन्यास मानवंदना अर्पण करण्यासाठी टीम आमची वसई ने दर वर्षी  प्रमाणे वसई किल्ल्यात दिपोत्सव साजरी करण्याचे ठरविले आहे. दिपोत्सवात पणत्या प्रज्वलित करून व रंगबेरंगी रांगोळ्या काढून, आकाशकंदील लावून नरवीर चिमाजी आप्पा स्मारक उजळवण्यात येणार. प्रवेशद्वार, तटबंदी, सागरी दरवाजा, सतीचा पार, ध्वजस्तंभ, हनुमान मंदिर व नागेश महातिर्थावरही पणत्या व तोरण लावून रांगोळी काढण्यात येणार आहे.
४ तारखेला सायंकाळी ५ वाजता किमान एक पणती व त्याला लागणारे तेल व वाती घेवून चिमाजी आप्पा स्मारकात जास्तीतजास्त नागरिकांनी व सामाजिक संस्थांनी हजर रहावे असे आवाहन आमची वसई ने केले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क ९३२३३९५५९८

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!