२८१व्या वसई विजयोत्सवाची जल्लोषात सुरुवात !

वसई : हिंदवी स्वराज्याचे छत्रपती शाहू महाराज यांचे पेशवे श्रीमंत बाजीराव यांचे धाकटे बंधू नरवीर चिमाजी आप्पांच्या नेतृत्वाखाली स्वराज्याच्या  शूरवीरांनी धर्मांध, जुलमी ,अराजक व आधुनिक शस्त्रास्त्रांनी सज्ज अश्या फिरंगी पोर्तुगीज सत्तेचे उत्तर कोंकणातून समूळ उच्चाटन केले.
पोर्तुगीजांच्या अराजकतेमुळे, धर्मांधतेमुळे, भेदाभेदामुळे, जुलमामुळे हैराण झालेल्या वसईकर रयतेला मुक्त व सुखी करण्यासाठी स्वराज्याच्या २२००० शूरविरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. एका युरोपीय सत्तेविरूद्ध मिळवलेला भारतातील हा पहिलाच विजय ! अश्या या ऐतिहासिक विजयाचा हा २८१वा विजयोत्सव !
वसई जिंकण्यासाठी नरवीर चिमाजी आप्पांनी योगिनी वज्रेश्वरी देवीकडे नवस केला होता. आईच्या कृपेने वसईवर स्वराज्याचा भगवा जरीपटका फडकला व वसई पुन्हा सुखी- आनंदी झाली. अश्या या ऐतिहासिक विजयानिमित्त गेली आठ वर्षे वसई विरार शहर महानगरपालिका व राज्य सरकार च्या महाराष्ट्र पर्यटन विभागातर्फे वसई विजयोत्सवाचे आयोजन करण्यात येते. दरवर्षी वज्रेश्वरी ते वसई किल्ला “भव्य मशालयात्रेचे” आयोजन करण्यात येते. या वर्षी मशालयात्रेत अनेक दुचाकी व चारचाकी स्वारांनी सहभाग घेतला. वज्रेश्वरी मंदिरात धर्मसभा सचिव पं.हृषीकेश वैद्य यांच्या हस्ते आरती करून मशालयात्रेची सुरुवात माजी खासदार बळीराम जाधव व नरवीर चिमाजी आप्पांच्या वेषातल्या वसईकराच्या हस्ते झाले. नरवीर चिमाजी आप्पांच्या व मावळ्यांच्या पोषाखातील “आमची वसई” च्या सदस्यांनी मशाल मिरवत पुढे नेली. पारनाका ते वसई किल्ला भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले. ढोल पथक व लेझीम च्या तालावर अवघा परिसर डोलत होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!