३० वर्षांची परंपरा खंडित ! यंदा नो कला क्रीडा महोत्सव

वसई (प्रतिनीधी) : दर वर्षी २६ ते ३१ डिसेंबर दरम्यान वसईत
भरणारा तालुका कला क्रीडा महा महोत्सव यंदा “कोरोना”
मुळे यंदा होतोय की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली होती.
कोरोना विरुद्धच्या उपाययोजना आणि त्या निमित्ताने आलेली कडक आचारसंहिता, एकत्र आणणे व येणे यावर नवे निर्बंध आले. प्रामुख्याने शैक्षणिक संस्था बंद असणे आणि सर्व प्रकारच्या कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली असल्याने वसई तालुक्यातील सर्व विभागीय आणि अखेरचा वसईतील कला क्रीडा महोत्सव आयोजित करणे अशक्य झाले आहे. असे चित्र स्पष्ट होताच तालुक्याचे लक्ष लागले होते ते आता या बाबत आम.हितेंद्र ठाकूर (सर्वेसर्वा) काय निर्णय घेणार.
अखेर या विषयावर वसई तालुका कला क्रीडा विकास मंडळाने तातडीने आपल्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी आपसात चर्चा करावी, यंदाच्या आयोजना बाबत निर्णय घ्यावा. अशा सूचना आमदारांकडून मिळताच २१ नोव्हेंबर रोजी वसईत संध्याकाळी तालुका कला-क्रीडा विकास मंडळाची बैठक झाली. क्रीडा भवनात झालेल्या या बैठकीत मंडळाचे सरचिटणीस प्रकाश वनमाळी, संघटक सचिव संतोष वळवईकर, सचिव केवल वर्तक, क्रीडा विभागाचे प्रमुख प्रा.माणिकराव दोतोंडे, मनोहर पाटील, विजय चौधरी यांनी उपस्थित विविध स्पर्धा प्रमुखांशी थेट संवाद साधला. अनेकांनी यंदाचा महोत्सव रद्द होऊ नये तर तो पुढे ढकलण्यात यावा.
काही स्पर्धा ऑनलाईन शक्य आहेत त्या व्हाव्यात असा विचार मांडला. पालक आणि शिक्षक अजुनही धास्तावलेल्या मनस्थितीत आहेत. सहभाग मिळणे कठीण आहे. अशीही परिस्थिती स्पष्ट करण्यात आली.

“एखाद्या तशा केसने सुद्धा आपल्या आयोजनाचा फज्जा उडविला जाईल, शिवाय ३१ वर्षांत आपण लौकीक राखला आहे त्याला तडा जाऊ शकतो. जोखीम आपल्या शासनाने सर्वांची घेतली आहे. आपण शासनाच्या निर्देशानुसार चाललं पाहिजे. जोखीम घेण्याची गरज नाही. ” – प्रा.माणिकराव दोतोंडे (सांघिक स्पर्धा प्रमुख)


“ऑलंपिक स्पर्धा रद्द होऊ शकतात, बिन प्रेक्षकांची सुद्धा क्रिकेट मालिका चालणार नाही. जगात अनेक ठिकाणी असं होऊ शकतं, एखाद्या वर्षी राष्ट्रीय संकटात अशा मोठ्या स्पर्धा रद्द होऊ शकतात. तर वसई महोत्सवाचा आग्रह धरणे चुकीचे ठरेल. पुढच्या वर्षी हे नुकसान आपण भरुन काढू.”- विजय चौधरी (आंतरराष्ट्रीय अॅथलिट आणि क्रीडा प्रमुख)


“आपण यंदाच्या आयोजना बाबत आम.हितेंद्र व क्षितीज ठाकूर, मुकेश सावे, मा.जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधून चर्चा केली आहे. कोणत्याही प्रकारची परवानगी दिली जाणार नाही असे जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले आहे. ऑनलाईन स्पर्धा आयोजित करणं आणि इतर सर्व स्पर्धा रद्द करणं अयोग्य होईल. परिस्थिती पूर्वपदावर यायला वेळ लागत आहे तर आपण पण सबुरीने घ्यावे. तोवर शासनाला आणि स्वत:ला जपणं याला प्राधान्य द्यावे. महोत्सवाला सुरुवात पाच महिने आधी सुरु होते. तेव्हा कुठे सर्व काही सुरळीत पार पडते. आर्थिक तरतूदही करावी लागते. यंदाचा महोत्सव काही ठिकाणी, काही प्रमाणात, पुढील वर्षी सुद्धा होऊ शकतो. आपल्या भावना समजल्या. महोत्सवाचे प्रणेते आम.हितेंद्र ठाकूर यांच्याशी चर्चा होईलच. अंतिम निर्णय तेच घेतील आणि जाहीरही करतील.” (प्रकाश वनमाळी, सरचिटणीस, व.ता.क.क्री.वि.मंडळ)

या बैठकीत सुरुवातीला शहीद जवान, दिवंगत कोरोना योद्धे, आणि मंडळाचे ज्येष्ठ पदाधिकारी जनार्धन संगम, डॉ.हेमंत पाटील यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
मंडळाच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली.

ग्रिष्मा पाटील यांचे अभिनंदन ! व शुभेच्छा !
अमेय क्लासिक क्लब इंटरनॅशनलच्या संचालिका सौ.ग्रिष्मा पाटील-पोटे यांची महाराष्ट्र राज्य खो खो संघटनेच्या उपाध्यक्ष पदावर नुकतीच निवड झाली आहे. या निमित्ताने त्यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा देण्यात आल्या. लवकरच पुढील बैठकी बाबत कळविले जाईल असे जाहीर करण्यात आले.
पदाधिकारी प्रितेश पाटील, प्रशांत घुमरे, रोमिओ सिरेजो,
विजय आडे, युगांत वाळिंजकर, पंकज वर्तक, राजेश जोशी एड.रमाकांत वाघचौडे, आंतरराष्ट्रीय थलिट अमन चौधरी यांनी चर्चेत भाग घेतला. बैठकीचे सूत्रसंचालन संतोष वळवईकर यांनी केले. केवल वर्तक यांनी आभारप्रदर्शन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!