५८ व्या राज्य नाटय स्पर्धेचा शुभारंभ, कल्याण केंद्रावर रसिकांची मोठी गर्दी

कल्याण (प्रतिनिधी) :  ५८ व्या राज्य नाटय स्पर्धेची सुरुवातच खळबळ जनक अशी झाली आहे. १५ नोव्हेंबर रोजी कल्याण केंद्रावर या स्पर्धेचा उदघाटन् सोहळा ( कंटाळवाणा ) सं.७ ऐवजी ७:३० ला सुरु झाला आणि तो तासभर चालला.माजी महापौर राजेंद्र देवळेकर आणि शासनाचे,महापालिकेचे,नाटय परिषदांचे पदाधिकारी उपस्थित असलेला हा सोहळा वगळता जे पहिले नाटक सादर होणार होते त्याचीच रसिक वर्ग आतुरतेने वाट पहात होते. अर्थात् ‘गस्त’ या नाटकाची, ते वाट पाहणारे कल्याण व मुंब्रैचे नाटय रसिक मोठया प्रमाणावर स्व. आचार्य अत्रे रंग मंदिरात उपस्थित होते. ही बाब इथे उल्लेखनीय आहे,कारण स्पर्धेतलं नाटक आणि उत्तम प्रतिसाद असं फारसं घडत नाही.

‘गस्त’ या पहिल्याच नाटकाला कल्याणकर नाटय रसिकांची उपस्थिती नव्या वा प्रायोगिक नाटकाच्या भवितव्यासाठी आशादायक बाब आहे. ५८ व्या राज्य नाटय स्पर्धेची फेरी कल्याण केंद्रावर सुरु झाली आहे. एकूण २३ नाटकं या केंद्रावर सादर होणार आहेत. गस्त ने तर खळबळ जनक व अत्यंत आक्रमक सुरुवात करुन दिली आहे. आता हा दर्जा कितपत राखला जातोय हे पाहणे औत्सुक्याचे ठरले आहे.  राज्य नाटय स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक नवी नाटकं रंगभूमी साठी दिली आहेत असे नाटककार प्रा.दिलीप जगताप यांचे हे नवे नाटक. जे त्यांनी गेल्या वर्षी ते अमेरिकेत असताना लिहिले आहे.१५ नोव्हेंबर रोजी ते या ठिकाणी यंदाचे पहिलेच नाटक म्हणून सादर झाले.अभिनय,कल्याण या संस्थेने ते सादर केले. आणि एकच खळबळ उडवून दिली आहे.नाटकाचे दिग्दर्शन म्हणजे काय काय करता येतं याचा धडा देणारा प्रयोग आणि नाटक या साहित्याच्या अंगाने काय काय आणि किती तरी लिहिता येतं याचा वास्तूपाठ नव्या पिढीला देणारा प्रयोग म्हणून ‘गस्त’ चा उल्लेख करावा लागेल.नाटकाचा पहिला अंक संपतो आणि चर्चा सुरू होते ती दिग्दर्शक अभिजीत झुंझारराव यांच्या दिग्दर्शन कौशल्याची आणि अभिनय कुशल राहुल शिरसाट यांच्या अभिनयातील हुकमतीची.प्रकाश योजनेतील शाम चव्हाण यांच्या जादुगिरीची.ही प्रकाश योजना ज्येष्ठ प्रकाश योजनाकार स्व. गिरीधर मोरे यांच्या कामाचे स्मरण करुन देणारी होती.

संगीत संयोजनात विठ्ठल व्हनमाने व राहुल शिरसाट यांनी जी ‘कल्पकत’ व अचुकता साधली आहे तिला सलाम. रंगभूषा व वेशभूषा ही जबाबदारी अभिनयच्या त्रुप्ती झुंझारराव यांनी सांभाळून नाटकाला विविध रंग छटा देण्याचे काम केले आहे.

 अभिनय क्षेत्रातील नवा सितारा ‘राहुल शिरसाट’ याच्या अभिनय कौशल्यास नवी किनार व नवी ओळख देणारे नाटक म्हणून ‘गस्त’ चा उल्लेख ओघाने होणारच. राहुल शिरसाट ( दहिफळे) आक्की ( रुचिका खैरनार ) लीना (सायली शिंदे),राहुल दुग्गल (डॉक्टर) युवराज ताम्हणकर (इसम) रेश्मा कदम (पोलीस) अभिनय लालखेडकर (माथेफिरु) श्रीकांत पालांडे ( घाटपांडे) रमजान मुलानी (रामू.)या कलावंतांच्या भूमिका प्रभावी ठरतात.

राहुल शिरसाट यांनी या नाटकाद्वारे अभिनय क्षेत्रात व स्पर्धेत तगडे आव्हान उभे केले आहे असे गस्त पाहणाऱ्या रसिक जनांचे मत आहे.सुरेख धाडसी संहिता, दमदार अभिनय,उत्तम टीम वर्क, झकास दिग्दर्शन, सर्व तांत्रिक बाजू छान आणि रसिकांचा उस्फुर्त प्रतिसाद ही गस्त ची बलस्थानं आहेत. संघ परिवार व संघ नियत यावर परखडपणे भाष्य करणारा आणि’मरण’ या विषयावरचा जिवंत अनुभव कथन करणारा हा प्रयोग मराठी रंगभूमीवर नवा इतिहास घडवेल असे हा प्रयोग बघणाऱ्या जाणकारांना वाटते.अभिनय कल्याण या संस्थेने दिग्दर्शक अभिजीत झुंझारराव यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय गांभीर्याने ‘गस्त’ घातली आहे.महाराष्ट्राच्या प्रत्येक केंद्रावर या नाटकाचे प्रयोग व्हावेत अशी अपेक्षा ज्येष्ठ रंगकर्मी शाम खेडेकर यांनी व्यक्त केली आहे.

थोडक्यात पण महत्वाचे  ‘अभिजीत ने प्रचंड मेहनत घेतली आहे या नाटकासाठी. दिग्दर्शक म्हणून तो थोर आहेच.शिवाय नेपथ्य रचनेत तो उजवा असतोच.’ – प्राची राठोड, कल्याण.

‘गस्त’चे लेखन उच्च मराठी साहित्य व्यक्त करते. नाटककार प्रा.दिलीप जगताप यांचे नाटक वैश्विक विचार मांडणारे असते. गस्त मधे त्यांनी संघ नीतीवर धारधार आसूड ओढले आहेत.मात्र तरीही हे नाटक राजकीय वाटत नाही. प्रयोग देखणा झाला. – प्रभाकर म.म्हात्रे, डोंबीवली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!